खाकी वर्दीतील
वेचक आठवणी

प्रस्तावना

एका मुलीने आपल्या वडिलांना वाहिलेली आगळी वेगळी श्रद्धांजली.

माझे वडिल, दिवंगत विजय राजाराम पेडणेकर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (मुंबई), यांनी त्यांच्या पोलीस जीवनाशी निगडित कार्यकाळाचा, कर्तृत्वाचा व गुणगौरवांचा ठेवा जो त्यांनी त्यांच्या मनात साठवून ठेवला होता तो ह्या पुस्तकरूपाने जगासमोर सादर करताना मला मनापासून आनंद होत आहे. ह्या पुस्तकात त्यांच्या जीवनातील पोलीस कालखंडात घडलेल्या काही वेचक आठवणी त्यांनी त्यांच्या शब्दात मांडल्या आहेत.
सर्वच गुन्ह्यांचा तपास कायद्याच्या चौकटीत राहून नुसत्या पुस्तकी ज्ञानाने होत नसून कधी कधी तेव्हा घडण्याऱ्या परिस्थितीनुसार. कधी सामंज्यस्याने, पुर्वानूभवाने, भावनिक आधार देऊन, तर कधी देवावरच्या श्रद्धेने पण सोडवला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
माझ्या वडिलांनी त्यांच्या कार्यकाळात किचकट आणि जाचक गुन्ह्यांचा तपास अतिशय कौशल्याने केला व पूर्ण कार्यकाळ त्यांनी गुन्हा तपास अधिकारी (Detection Officer ) म्हणूनच काम केले. त्यातील बऱ्याच सत्यकथा यापूर्वीच 'दक्षता' व 'लोकप्रभा' अशा नामांकित मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि सर्वानी त्या वाचल्या देखील आहेत.
त्यांनी त्यांच्या संपूर्ण पोलीस जीवनात ज्या प्रकारे गंभीर गुन्ह्यांचा तपास केला ते वाचून इतरांना देखील मार्गदर्शन व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. परंतु दुर्दैव! दिनांक २३/०६/२०१६ रोजी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, पूर्ण करण्याचा वसा मी त्यांची मुलगी या नात्याने स्विकारला. त्यांनी त्यांच्या हयातीत लिहिलेल्या ' खाकी वर्दीतील वेचक आठवणी' मी पुस्तकरूपी प्रकाशित करून त्यांच्या चरणी विनम्र भावाने अर्पण करीत आहे.
या पुस्तकाचे मुळ लेखक माझे वडिल दिवंगत विजय राजाराम पेडणेकर हेच असून मी फक्त निमित्तमात्र आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते. तसेच ह्या पुस्तकात काही त्रुटी राहिल्यास दिलगिरीही व्यक्त करते.

-सौ. भावना पेडणेकर चोरगे



अभिप्राय

तुमचा पुस्तकाबद्दलचा अभिप्राय आम्हाला कळवा.